तुळजापूर (प्रतिनिधी)-: ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेली पाण्याची टाकीच आता नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. काटगाव येथील घट्टेवाडी परिसरातील पाण्याच्या टाकीत मोठ्या प्रमाणात घाण साचलेली असून, टाकीची स्वच्छता गेल्या दीड वर्षांपासून करण्यात आलेली नाही, असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. तुळजापूर तालुक्यातील आडगाव ग्रामपंचायत च्या कारभार तालुक्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला असुन गटविकास अधिकारी यांनी या गावाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे बनले आहे
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेली ही योजना सुरू होऊन वर्ष ते दीड वर्ष उलटले असले तरी अद्याप टाकीची नियमित स्वच्छता करण्यात आलेली नाही. याबाबत वारंवार ग्रामपंचायतीकडे मागणी करूनही सरपंच व ग्रामसेवक दुर्लक्ष करत असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
नागरिकांनी सांगितले की, पाण्याच्या टाकीत साचलेल्या घाणीमुळे दूषित पाणीपुरवठा होत असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप करण्यात आला.
याशिवाय गावातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. गावात पाणी सोडण्यासाठी बसविण्यात आलेला मुख्य वॉल खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. याबाबत अनेकदा माहिती देऊनही दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेली पाइपलाइन गावाबाहेरील भागात सुमारे सव्वातीन फूट खोल टाकण्यात आली आहे, तर ग्रामपंचायतीमार्फत गावातील अंतर्गत पाइपलाइन केवळ अर्धा फूट खोलीवर टाकण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यावेळी संपूर्ण दाब बाहेरील भागातील नळांना मिळतो आणि गावातील नागरिकांना केवळ पाच मिनिटेच पाणी मिळते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गावाबाहेरील काही नळांना तोट्या नसल्यामुळे टाकीतील मोठ्या प्रमाणात पाणी थेट वाया जात असल्याचेही समोर आले आहे. टाकी भरण्यास तब्बल तीन तास लागत असताना भरलेले पाणी काही मिनिटांतच गळती आणि उघड्या नळांमधून वाहून जात असल्याने ऐन उन्हाळ्यात पाण्याची नासाडी होत आहे.
या योजनेसाठी नियुक्त करण्यात आलेला कर्मचारी देखील वेळेवर मोटार सुरू-बंद करत नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे घट्टेवाडीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, सरपंच व ग्रामसेवक जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने टाकीची स्वच्छता करून गळती थांबवावी, खराब वॉल दुरुस्त करावा आणि संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
