तुळजापूर (प्रतिनिधी)-: तुळजापूर तालुक्यातील जवळगा येथील चार वर्षीय चिमुकल्याचा कुलरचा करंट लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि. 11) तोरंबा तालुका जिल्हा धाराशिव येथे घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक विठ्ठल साळुंखे (वय 4, रा. जवळगा) याला त्याची आजी तोरंबा येथे घेऊन आली होती. दुपारच्या सुमारास परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे घरातील सर्व मंडळी घराबाहेर बसली होती. दरम्यान अचानक वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कार्तिकचा हात घरातील कुलरला लागला. कुलरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला जोरदार करंट बसला. या घटनेत कार्तिक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आई-आजीचा आक्रोश
या घटनेनंतर चिमुकल्याचा मृतदेह तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. यावेळी आई आणि आजीने फोडलेला आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती.
