तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील काक्रंबा येथील मुस्कान रोऊफ शेख हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नवी मुंबई पोलीस दलात निवड मिळवली आहे. या यशामुळे ती काक्रंबा गावातून पोलीस दलात निवड होणारी पहिली महिला ठरली असून संपूर्ण परिसरातून तिचे कौतुक होत आहे.
मुस्कानने अत्यंत कठीण परिस्थितीत हे यश मिळवले आहे. तिच्या कुटुंबात पाच बहिणी असून एक भाऊ अपंग आहे. आई घरकाम करून संसाराचा गाडा चालवते, तर वडिलांचे निधन झालेले आहे. अशा परिस्थितीतही मुस्कानने जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केले. आपल्या भावना व्यक्त करताना मुस्कान शेख म्हणाली, “देशसेवेची संधी मिळाल्याचा मला अभिमान आहे. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे मी आभार मानते. पुढील काळात मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणार आहे.” मुस्कान चे हे यश ग्रामीण भागातील मुलींसाठी ती प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या कामगिरीमुळे शिक्षण व स्पर्धा परीक्षांकडे मुलींचा कल वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
