तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील नागरिकांसाठी राखीव असलेली ओपन स्पेस (मोकळी जागा) हळूहळू कमी होत असल्याचा गंभीर आरोप करत दोन नागरिकांनी थेट नगरविकास मंत्र्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे शहरातील नियोजन आणि अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रकाश बळीराम घट आणि बाळासाहेब सर्जेराव कुतवळया नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर शहराच्या विकास आराखड्यातील मोकळ्या जागांचा योग्य वापर न होता त्या ठिकाणी अन्य बांधकामे किंवा अतिक्रमणे होत आहेत. त्यामुळे नागरिकांना खेळण्यासाठी, फिरण्यासाठी आणि सार्वजनिक उपयोगासाठी असलेल्या जागांचा अभाव जाणवत आहे. निवेदनानुसार, शहरात गेल्या 25 ते 30 वर्षांत अनेक विकासकामे झाली असली तरी नियोजनबद्ध पद्धतीने ओपन स्पेस राखल्या गेल्या नाहीत. परिणामी, पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
तक्रारदारांनी पुढे नमूद केले आहे की, काही ठिकाणी ओपन स्पेसवर अनधिकृत बांधकामे उभी राहिली असून प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी आणि मूळ आराखड्यानुसार मोकळ्या जागा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.दरम्यान, या तक्रारीमुळे स्थानिक प्रशासनाची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनीही शहरातील सार्वजनिक जागा वाचवण्यासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली आहे.