धाराशिव (प्रतिनिधी)- न्याय मिळवण्यासाठी न्यायालयाच्या दारात प्रत्यक्ष हजर राहणेच आवश्यक असते,ही पारंपरिक समजूत आता बदलत असल्याचे प्रेरणादायी उदाहरण धाराशिवमध्ये पाहायला मिळाले.सात समुद्रापार अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या एका पक्षकाराने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकअदालतीत सहभाग नोंदवत, अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला वाद सामोपचाराने मिटवला. तंत्रज्ञान आणि न्यायव्यवस्थेचा सुंदर संगम घडवणारा हा निर्णय जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा अभिश्री देव आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील यांच्या विशेष पुढाकारातून हा अनोखा उपक्रम यशस्वी झाला. नेमकी घटना अशी आहे की, ‘रविशंकर विरुद्ध नागनाथ व इतर' (नि. दि. दा. नं. 140/2026) या प्रकरणातील एक पक्षकार सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत. भौगोलिक अंतर,प्रवासाचा खर्च आणि वेळेच्या अडचणींमुळे हे प्रकरण आणखी लांबण्याची शक्यता होती.मात्र,धाराशिव येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वैयक्तिक वाद निवारण केंद्राने आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत हा अडथळा दूर केला.
लोकअदालतीचे महत्त्व लक्षात घेऊन अमेरिकेतील पक्षकाराला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून थेट प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती.अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली,दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सचिन पाटील यांच्या पॅनलसमोर दोन्ही बाजूंनी सामोपचाराची भूमिका घेतली आणि दि.9 मे 2026 रोजी हे प्रकरण यशस्वीरीत्या निकाली काढण्यात आले. या तडजोड प्रक्रियेत दोन्ही बाजूंच्या विधिज्ञांनीही सकारात्मक भूमिका बजावली. वादीच्या वतीने ॲड. एन. एन. वाघोलीकर यांनी तर प्रतिवादीच्या वतीने ॲड.ए.व्ही. देशपांडे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.