धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात पोखरा योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या 132 गावांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ पोखरा योजनेपुरते मर्यादित न राहता जलसंधारण,रोजगारनिर्मिती,युवक सक्षमीकरण आणि विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात येणार असून आदर्श गाव निर्मितीचा संकल्प करण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावात किमान 10 तरुण उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.ग्रामीण युवकांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यात येणार आहे. दाल मिल, हळद व मिरची पावडर निर्मिती ,ठिबक सिंचन योजना, मत्स्य व्यवसाय, शेततळे, फळबाग योजना तसेच विहीर पुनर्भरण यांसारख्या विविध योजनांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.त्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी या उपक्रमात ‘एक खिडकी योजना' प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.कृषी विभागामार्फत जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले जाणार असून महिला व बालकल्याण तसेच समाजकल्याण विभागाच्या योजनांची व्यापक जनजागृती केली जाणार आहे. या मोहिमेत विविध सेवाभावी संस्थांचा सहभाग राहणार असून, विशेषतः ‘आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग असणार आहे.