धाराशिव (प्रतिनिधी)-  शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महसूल विभागाच्या वतीने धाराशिव मंडळाचे ‌‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' आयोजित करण्यात आले होते. धाराशिव शहरातील परिमल मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध दाखले, प्रमाणपत्रे तसेच महसूल विभागाशी संबंधित अनेक कामे तत्काळ पूर्ण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

शिबिराचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष नेहा काकडे, तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, मुख्याधिकारी नीता अंधारे, नायब तहसीलदार घृष्णेश्वर स्वामी, महादेव शिंदे, विशाखा बलकवडे तसेच तालुका कृषी अधिकारी राहुल दिवाने यांच्यासह मंडळ अधिकारी आणि तलाठी उपस्थित होते. या शिबिरात तब्बल 1 हजार 298 नागरिकांनी सहभाग नोंदवून विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला. महसूल, कृषी, ग्रामविकास, आरोग्य, महिला व बालविकास, भूमी अभिलेख, पुरवठा, एसटी महामंडळ, उमेद आणि समाजकल्याण विभागांचे स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आले होते. नागरिकांच्या विविध अडचणी आणि प्रलंबित कामांचे तात्काळ निराकरण करण्यावर विशेष भर देण्यात आला. तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक भेट घेत त्यांच्या समस्या समजून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या. 


अनेक प्रकरणी निकाली

यावेळी माहिती देताना तहसीलदार मृणाल जाधव यांनी सांगितले की, महसूल विभागामार्फत 145 फेरफार प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच 185 डिजिटल 7/12 उतारे आणि 185 आठ-अ उतारे उपलब्ध करून देण्यात आले. विविध प्रकारची 282 प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली असून त्यामध्ये 97 जात प्रमाणपत्रे, 101 उत्पन्न प्रमाणपत्रे, 35 रहिवासी प्रमाणपत्रे आणि 16 नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्रांचा समावेश होता. एक खिडकी योजनेअंतर्गत पीएम किसान, महिला व बालविकास, ग्रामविकास, आरोग्य विभाग आदी योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज स्वीकारण्यात आले. महिला व बालविकास विभागाच्या ‌‘लाडकी बहीण' योजनेसाठी 114 लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. ग्रामविकास विभागाकडे 84 अर्ज, आरोग्य विभागाकडे 45 अर्ज तर पीएम किसान योजनेसाठी 20 अर्ज प्राप्त झाले. शिबिरात रेशनकार्ड दुरुस्ती व नवीन रेशनकार्डसाठी सर्वाधिक 363 अर्ज प्राप्त झाले. याशिवाय 69 शिधापत्रिका, 28 संजय गांधी योजना लाभ, 16 आयुष्यमान कार्ड सेवा तसेच 27 मतदार नोंदणी व दुरुस्ती प्रकरणे मार्गी लावण्यात आली. 

 
Top