तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील अपसिंगा-संगमनेर रस्त्यावर सिमेंट नळी पुलांची कामे पूर्ण झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. या रस्त्यालगत अपसिंगा येथील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात शेती असून, शेतीमालाची वाहतूक करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पूर्वी या मार्गावर बैलगाड्या उलटणे, ट्रॅक्टर अडकणे, कांदा व द्राक्ष वाहतूक करणारी वाहने अडथळ्यात सापडणे अशा घटना वारंवार घडत होत्या. तसेच भाजीपाला व इतर शेतमाल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुचाक्या घसरून अपघात होण्याचे प्रकारही घडत होते.
जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत उपविभाग तुळजापूर यांच्या माध्यमातून या ठिकाणी सिमेंट नळी पुलांची निर्मिती करण्यात आली आहे. संबंधित गुत्तेदाराने काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण केले असून पुलांच्या दोन्ही बाजूंना शेतकऱ्यांच्या बांधावर माती टाकून रस्ता सुकर करण्यात आला आहे.
या उत्कृष्ट कामामुळे अल्पभूधारक, बागायतदार शेतकरी, वृद्ध महिला तसेच या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पुलांच्या कामामुळे शेतीमालाची वाहतूक आता अधिक सुरक्षित व सुलभ झाली असून परिसरातील शेतकऱ्यांकडून प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे.
पुलामुळे आमचा त्रास वाचला
माझ्या शेता जवळ काम असल्यामुळे मी दररोज बघत होतो काम व्यवस्थित व समाधानकारक झालेले आहे, पुल झाल्यामुळे माझ्या सह परिसरातील शेतकऱ्यांना व शेतमजुरांना मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे..
तात्यासाहेब हाके - शेतकरी आपसिंगा.
