धाराशिव (प्रतिनिधी)- विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया शांततेत,निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी विविध निर्बंध लागू केले आहेत.

भारत निवडणूक आयोगाने 18 मे 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक -2026 (उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघ) नुसार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून,कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भय आणि न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून सभा,मिरवणुका, निवडणूक प्रचार आदी बाबींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याची खात्री जिल्हादंडाधिकाऱ्यांना झाली आहे. 

सर्व संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून आदेश जारी केले आहेत.  त्यानुसार निवडणुकीच्या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय,सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसील कार्यालये तसेच सर्व शासकीय विश्रामगृहे या ठिकाणी, नगरपरिषद हद्दीत पुढील बाबींना बंदी घालण्यात आली आहे.त्यामध्ये कोणत्याही प्रकारची मिरवणूक किंवा मोर्चा काढणे, आंदोलन, निदर्शने किंवा उपोषण करणे, कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी करणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे तसेच कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे यांचा समावेश आहे.हा आदेश 18 मे ते 25 जून 2026 या कालावधीत धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यांत लागू राहणार आहे.

 
Top