धाराशिव (प्रतिनिधी)-   विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्षांचे झेंडे,कापडी फलक लावणे आदी बाबींवर काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये हे आदेश जारी केले आहेत.

भारत निवडणूक आयोगाने 18 मे 2026 रोजी उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून,त्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्षांचे झेंडे,प्रचाराचे कापडी फलक लावणे यावर काही बंधने घालणे आवश्यक असल्याची खात्री प्रशासनाला झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे 6 म्हणणे ऐकून घेणे शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी जारी केलेल्या आदेशानुसार फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंडस्क्रीन ग्लासच्या पुढे राहणार नाही तसेच तो वाहनाच्या टपापासून दोन फूट उंचीपेक्षा जास्त असणार नाही. मोटारसायकलवरील झेंड्याचा आकार दीड फुटांपेक्षा अधिक असू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे आणि वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूसच लावता येणार असून,इतर कोणत्याही बाजूस फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय पक्ष प्रचाराचे झेंडे किंवा कापडी फलक हे संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष,उमेदवार अथवा उमेदवारांच्या निवडणूक प्रतिनिधी यांच्या वाहनांव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार7 नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. हे आदेश धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यांत आदेश निर्गमित झाल्याच्या तारखेपासून 25 जून 2026 पर्यंत लागू राहणार आहेत.


 
Top