भुम (प्रतिनिधी)-  भूम तालुक्यातील वांगी खुर्द येथील शेतकरी महादेव मंगिरे यांच्या शेतातील ज्वारीचा कडबा दि. 12 मे रोजी दुपारच्या वेळेस विद्युत तारेतून निघालेल्या स्पार्कमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाला. या आगीत सुमारे 26 हजार कडब्याच्या पेंड्या भस्मसात झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

महादेव मंगिरे यांनी जनावरांच्या वर्षभराच्या वैरणीसाठी मोठ्या प्रमाणात ज्वारीचा कडबा विकत घेऊन शेतात तीन ठिकाणी गंजी करून साठवून ठेवला होता. या गंजीजवळून गेलेल्या विद्युत तारेच्या घर्षणामुळे अचानक स्पार्क झाला आणि त्यातून ठिणग्या पडून आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत कडब्याच्या गंजींना वेढा घातला. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, कडबा कोरडा असल्याने आग वेगाने पसरली. घटनेची माहिती मिळताच बार्शी अग्निशमन दल यांची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून एका गंजीतील आग नियंत्रणात आणली. परंतु तोपर्यंत जवळील दोन गंजी पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या.

या आगीत सुमारे 26 हजार कडब्याच्या पेंड्या जळाल्याने मंगिरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जनावरांच्या चाऱ्याचा मोठा साठा नष्ट झाल्याने त्यांच्यासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. घटनेनंतर पंचनामा करून शासनाने तातडीने आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, उन्हाळ्याच्या दिवसांत विद्युत तारा सैल होणे, घर्षण होणे आणि त्यातून ठिणग्या पडण्याच्या घटना वाढत असल्याने महावितरणने ग्रामीण भागातील विद्युत वाहिन्यांची तातडीने तपासणी करावी, अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

 
Top