धाराशिव (प्रतिनिधी) - धाराशिव जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे कायम असल्याने प्रशासनाचा कारभार अक्षरशः ढासळला असून सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी केला आहे.

या संदर्भात परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना सविस्तर निवेदन देण्यात आले असून, जिल्ह्यातील सर्व रिक्त पदे व प्रलंबित पदोन्नती आदेश दि. 31 मे 2026 पर्यंत पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील अनेक शासकीय विभागांमध्ये अ, ब, क आणि ड श्रेणीतील पदे वर्षानुवर्षे रिक्त असल्याने प्रशासनाची कार्यक्षमता कोलमडली आहे. अनेक ठिकाणी एकाच अधिकाऱ्याकडे दोन-दोन तालुक्यांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून, काही कार्यालये आठवड्यातील मर्यादित दिवसच सुरू राहत आहेत. परिणामी नागरिकांची कामे रखडत असून शासकीय कार्यालयांमध्ये प्रचंड अराजकता निर्माण झाली आहे. राजाभाऊ राऊत यांनी प्रशासनावर गंभीर टीका करताना म्हटले की, “रिक्त पदांमुळे सामान्य नागरिकांना वेळेत सेवा मिळत नाही. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 चा हा थेट भंग आहे. तसेच भारतीय राज्यघटनेतील कलम 14 व 16 नुसार नागरिकांना समान सेवा मिळण्याच्या अधिकारालाही बाधा पोहोचत आहे.”

तसेच जिल्ह्यातील अनेक अधिकारी व कर्मचारी कालबद्ध पदोन्नतीस पात्र असूनही त्यांचे पदोन्नती आदेश शासन स्तरावर प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पात्र कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदाचा वेतन लाभ दिला जात असला तरी प्रत्यक्ष पदभार देण्यात येत नसल्याने प्रशासनातील कामकाजावर गंभीर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. “रिक्त पदे भरणे आणि पदोन्नती आदेश काढण्यासाठी शासनाच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार नाही. केवळ प्रशासकीय इच्छाशक्तीची गरज आहे,” असेही राऊत यांनी स्पष्ट केले. दि. 31 मे 2026 पर्यंत जिल्ह्यातील सर्व विभागांतील रिक्त पदे भरणे, प्रलंबित पदोन्नती आदेश काढणे आणि प्रशासन सुरळीत करण्यासाठी ठोस निर्णय न घेतल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) पक्षाच्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.


 
Top