तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरातील बोंबल्या चौक भागात एका युवकावर चाकू हल्ला झाल्याची घटना गुरुवारी (दि.22 मे) रात्री सुमारे सव्वादहा वाजण्याच्या सुमारास घडली. सुरुवातीला दोन जणांमध्ये साधी बाचाबाची झाली, मात्र काही क्षणांतच या वादाचे रूपांतर थेट चाकू हल्ल्यात झाले. या हल्ल्यात शहरातील व्यावसायिक कापड दुकानदार मयूर बाळासाहेब पेंदे हे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, तुळजापूर शहरातील हडको भागातील बोंबल्या परिसरात रात्रीच्या सुमारास वाहन काढण्याच्या कारणावरून मयूर पेंदे आणि एका अज्ञात युवकामध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद निर्माण झाला. परिसरातील नागरिकांच्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून सुरू झालेली ही वादावादी काही क्षणांतच तीव्र स्वरूप धारण करत गेली. दोघांमध्ये जोरदार बाचाबाची सुरू असताना अचानक संबंधित युवकाने संतापाच्या भरात थेट चाकूने हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.
या हल्ल्यात मयूर पेंदे यांच्या पोटावर तसेच डोक्याच्या भागावर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पेंदे यांना नागरिकांनी आणि उपस्थितांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने सोलापूर येथे हलविण्याचा निर्णय घेतला. सध्या जखमी मयूर पेंदे यांच्यावर सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस यंत्रणेकडून या घटनेचा अधिक तपास सुरू असून आरोपीचा शोध घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळत आहे.
