भूम (प्रतिनिधी)-  भारतीय जनगणना प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली असताना आपल्या कर्तव्यास गैरहजर राहिल्याप्रकरणी भूम येथील गुरुदेव हायस्कूल येथील शिक्षक आबासाहेब ढगे यांच्याविरुद्ध भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनगणना 2027 सारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय कार्यासाठी भारतीय जनगणना अधिनियम 1948 अंतर्गत नियुक्ती होऊनही कोणतीच माहिती  वेळेत पूर्ण न केल्याने अखेर प्रशासनाने  आदेशाचे उल्लंघन आणि कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप भूम पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे. 

यासंदर्भात नायब तहसीलदार तथा जनगणना अधिकारी (शहर) भूम नगर परिषद प्रविण जाधव यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार गुरुदेवदत्त हायस्कुल येथील शिक्षक आबासाहेब ढगे यांची भारतीय जनगणना अधिनियम 1948 अंतर्गत प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी जनगणनेचे कामकाज केले नसून , कामाच्या ठिकाण गैरहजर राहिल्याने जनगणनेच्या कर्तव्यात कसूरपणा केल्याचे दिसून आले आहे.

माहितीनुसार भारतीय जनगणना अधिनियम 1948 च्या कलम 11 (1) (अ) नुसार जनगणनेच्या कामावर हजर राहण्यास नकार देणे अथवा आदेशाचे पालन न करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. राष्ट्रीय महत्त्वाच्या कामात जाणीवपूर्वक अडथळा आणल्याचा ठपका ठेवत आणि जनगणना कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकां विरोधात भारतीय जनगणना अधिनियम 1948 च्या कलम 4(4) उपकलम अंतर्गत भूम पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने शिक्षक आबासाहेब ढगे यांना हे प्रकरण चांगलेच महागात पडले.

 
Top