तुळजापूर (प्रतिनिधी)- शाळेंना उन्हाळी सुट्टी झाल्याने वशुक्रवार शनिवार रविवार अशा सलग सुट्ट्या आल्याच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर पहाटे एक वाजता चरणतीर्थ करून धर्मदर्शन भाविकांसाठी खुले करण्यात आले होते.
दिवसभर धर्मदर्शन, अभिषेक व सशुल्क मुखदर्शनाच्या रांगा खचाखच भरलेल्या होत्या. सकाळी आठ वाजल्यानंतर गर्दीत मोठी वाढ झाली आणि दुपारी चारपर्यंत ती कायम होती. सायंकाळी काही प्रमाणात गर्दी कमी झाल्याचे दिसून आले. दर्शनानंतर भाविकांनी बाजारपेठेत प्रसाद व पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी मोठी गर्दी केली. खासगी वाहनांद्वारे मोठ्या संख्येने भाविक आल्याने वाहनतळ पूर्ण भरले होते. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर थंड पाण्याच्या बाटल्याही दुप्पट दराने विकल्या गेल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, मंदिर दिवसभर सलग 22 तास भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले होते. रात्री मंदिर प्रांगणात देवीजींचा छबिना करण्यात आल्यानंतर पक्षाळ पूजा होऊन रात्री मंदिर बंद करण्यात आले.
