धाराशिव (प्रतिनिधी)- विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध दारू विक्री रोखण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे.भारत निवडणूक आयोगाने 18 मे 2026 रोजी उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी संबंधित विभागांना निर्देश दिले आहेत.आपल्या कार्यक्षेत्रात अवैध दारू विक्री होत असल्यास पोलीस पाटील यांनी तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यास तसेच संबंधित विभागाला माहिती द्यावी,असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच,अवैधरित्या दारू विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर सर्वस्वी जबाबदारी निश्चित करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.