धाराशिव (प्रतिनिधी)- खरीप हंगाम 2020 आणि 2025 च्या प्रलंबित पीक विम्याच्या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी एक रूपया पीकविमा योजना परत चालू करण्याची घोषणाबाजी केली.
या धरणे आंदोलनात खरीप 2020 मधील तब्बल 134 कोटी रुपयांच्या पीक विम्याला कोणतीही कायदेशीर स्थगिती नाही. त्यामुळे ते पैसे शेतकऱ्यांना त्वरीत द्यावेत. खरीप 2025 चा पीक विमा नाकारला जात आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये चालू वर्षाच्या पीक विम्याचे वितरण सुरळीत सुरू आहे. मात्र, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच यातून डावलले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जवळपास 600 कोटी रुपयांची भलीमोठी रक्कम अडकून पडली आहे, ज्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासनाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन 13 मे पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याचे पैसे जमा करावेत, अन्यथा 14 मे रोजी नारंगवाडी येथे रस्त्यावर उतरून तीव्र ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.