तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र तुळजापूर पासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर तुळजापूर लातूर महामार्गावर अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या काक्रंबा येथे ग्रामपंचायतीच्या स्वच्छतेच्या कारभाराबाबत नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावातील गटारी तुंबल्याने घाणीचे पाणी थेट रस्त्यावर वाहत असून त्यामुळे उन्हाळ्यात साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
काक्रंबा हे तुळजापूर तालुक्यातील सुमारे नऊ ते दहा हजार लोकवस्तीचे महामार्गालगतचे महत्त्वाचे गाव आहे. मात्र, ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे गावातील मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. गावात सिमेंट नाल्यांचे बांधकाम करण्यात आले असले तरी अनेक ठिकाणी हे काम अर्धवट अवस्थेत आहे. नाल्यांना योग्य उतार न दिल्याने तसेच नियमित साफसफाई न झाल्याने नाल्यांमध्ये कचरा साचून त्या पूर्णपणे तुंबल्या आहेत.
यामुळे साचलेले सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असून अनेक ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.
डासांचा प्रादुर्भाव; साथी रोगांची भीती
नाल्यांतील घाणपाणी अनेक दिवस एकाच ठिकाणी साचून राहत असल्याने डासांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, ग्रामपंचायतीने वेळेत स्वच्छता मोहीम राबवली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती.
काक्रंबा ग्रामपंचायतीचा कारभार आधीपासूनच तालुका व जिल्हाभर चर्चेचा विषय ठरत आहे. मूलभूत सुविधा पुरवण्यात सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर तीव्र झाला आहे. ग्रामपंचायतीने तातडीने नाल्यांची स्वच्छता करून गावाला साथीच्या रोगांच्या धोक्यातून मुक्त करावे, अन्यथा संबंधित सरपंच ग्रामसेवक व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
तातडीने उपाययोजनांची गरज
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
