धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यामध्ये पेट्रोल व डिझेलचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. अनेक पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कृत्रिम तुटवडा निर्माण करून जादा दराने विक्री केली जात असल्याचेही निदर्शनास येत आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळेची उपाययोजना करावी अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे.
खासदार निंबाळकर यांनी सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होत असून, जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेती मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत. अशा अत्यावश्यक काळात इंधनाची कमतरता भासत असल्यामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबत आहेत व त्यांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच दैनंदिन कामकाजासाठी इंधनावर अवलंबून असलेल्या नागरिकांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील प्रशासन, जिल्हा पुरवठा विभाग आणि पोलीस यंत्रणा यांच्या समन्वयातून प्रभावी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधन टँकर येऊन उतरत असताना तसेच इंधन वितरणाच्या प्रक्रियेदरम्यान शासकीय अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित राहिल्यास पारदर्शकता राखली जाऊन गैरप्रकारांना आळा बसू शकतो. सदर परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात व जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तात्काळ कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
