तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापुरातील पापनास नगर परिसरात वास्तव्यास असलेला अविनाश सुधीर जमादार हा अवघा आठवी पास असला तरी त्याच्या गणितातील अफाट ज्ञानामुळे सध्या शहरात तो चर्चेचा विषय ठरत आहे. अत्यंत कठीण आकडेमोड क्षणार्धात सोडविण्याची क्षमता असलेल्या अविनाशच्या बुद्धिमत्तेने अनेकजण अचंबित होत आहेत.
सामान्य शिक्षण घेतलेल्या या तरुणाची गणितावरील पकड इतकी जबरदस्त आहे की, तो मोठमोठ्या आकड्यांचे गुणाकार, भागाकार आणि अवघड गणिते काही क्षणांत सोडवतो. विशेष म्हणजे 99 हजार 999 पर्यंतचे पाढे तो सहजगत्या तोंडपाठ सांगतो. चार अंकी संख्यांचा गुणाकार आणि भागाकार कोणतेही कागद-पेन न वापरता त्वरित उत्तरासह सांगण्याची त्याची क्षमता पाहून अनेकजण त्याची तुलना कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय'शी करत आहेत. अविनाश केवळ साधी आकडेमोडच नाही, तर कोटी, अब्ज, खर्व अशा मोठ्या संख्यांची मांडणी आणि गणितेही सहजतेने करतो. कोणतीही संख्या ऐकताच त्यावरील गणिती प्रक्रिया तो क्षणात करून दाखवत असल्याने त्याच्या या कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विशेष बाब म्हणजे घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही अविनाशने स्वतःच्या जिद्द आणि आवडीच्या जोरावर गणितातील हे विलक्षण कौशल्य आत्मसात केले आहे. आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणाची संधी मर्यादित असली तरी त्याच्या बुद्धिमत्तेने परिसरातील नागरिकांना थक्क केले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास अविनाश जमादार भविष्यात गणित क्षेत्रात मोठे यश संपादन करू शकतो. त्याच्या या विलक्षण प्रतिभेला शासन किंवा सामाजिक संस्थांनी व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही आता परिसरातून होत आहे. तुळजापुरासारख्या धार्मिक नगरीतून समोर आलेली ही अनोखी गणिती प्रतिभा सध्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
