धाराशिव  (प्रतिनिधी)-  जिल्ह्यातील पोलीस दलाची कार्यक्षमता,गतिमानता आणि आपत्कालीन प्रतिसाद अधिक प्रभावी करण्यासाठी विविध अत्याधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आला असून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या नव्या वाहनांचे लोकार्पण आज 1 मे महाराष्ट्र दिनी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,पोलिस अधीक्षक रितू खोखर,अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 च्या निधीतून ही वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहे.या उपक्रमामुळे पोलीस विभागाच्या दैनंदिन कामकाजासह विशेष बंदोबस्त व्यवस्थापन अधिक सक्षम होणार आहे.पोलीस दलासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या वाहनांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासाठी 5 स्कॉर्पिओ क्लासिक वाहने,प्रथम प्रतिसाद पथक साठी 6 बोलेरो निओ वाहने,डायल 112 अंतर्गत दुय्यम प्रतिसाद पथकासाठी 14 बोलेरो बेसिक मॉडेल वाहने तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी 1 अशोक लेलँड ट्रकचा समावेश आहे.

ही वाहने पायलटिंग,एस्कॉर्ट सेवा, व्हीआयपी बंदोबस्त,जयंती उत्सव, यात्रा बंदोबस्त तसेच विशेष सुरक्षा नियोजनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. नव्या वाहनांमुळे घटनास्थळी जलद पोहोचणे,आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत,कायदा व सुव्यवस्था राखणे आणि मोठ्या प्रमाणावरील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्रभावी समन्वय साधणे अधिक सुलभ होणार आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नव्या पोलीस वाहनांचे लोकार्पण केल्यानंतर नव्याने पोलिस दलात समाविष्ट करण्यात आलेल्या वाहनांपैकी स्कॉर्पिओ हे वाहन स्वतः पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी चालवित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आयोजित कार्यक्रमस्थळी आगमन झाले. 


 
Top