धाराशिव (प्रतिनिधी)-‌ ‘मॉलिक्युलर डायग्नोस्टिक लॅब‌’ सारख्या अत्याधुनिक सुविधांविषयी बोलताना अत्यंत आनंद होत आहे.आरोग्य क्षेत्रात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने झालेली प्रगती ही आपल्या समाजासाठी मोठी देणगी आहे.आजच्या काळात आजारांचे निदान जितके लवकर आणि अचूक होईल,तितके उपचार अधिक प्रभावी होतात.असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

1 मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे  स्थापन करण्यात आलेल्या पीसीआर मॉड्युलर लॅब व स्किल लॅबचे उद्घाटन पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते आज करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला मंचावर मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर,पोलीस अधीक्षक रितू खोखर,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.

पालकमंत्री सरनाईक म्हणाले की, मॉलिक्युलर लॅबमध्ये डीएनए, आरएनए आणि जनुकीय स्तरावर तपासण्या केल्या जात असल्यामुळे आजारांचे निदान जलद, अचूक आणि विश्वासार्ह पद्धतीने करता येते. कोविड-19, क्षयरोग, एचआयव्ही,हिपॅटायटिस यांसारख्या गंभीर आजारांचे वेळेत निदान होणे अत्यंत गरजेचे असून ही सुविधा ते शक्य करून देते.या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एकाच वेळी अनेक जंतू आणि विषाणूंची ओळख पटवता येते.एका पॅनेलमध्ये 25 ते 100 पर्यंत सूक्ष्मजंतू शोधण्याची क्षमता ही या प्रणालीची ताकद आहे.त्यामुळे रुग्णाला नेमका कोणता संसर्ग झाला आहे,हे त्वरीत समजते आणि योग्य उपचार देणे शक्य होते.असे सरनाईक यांनी सांगितले. आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले,या लॅबच्या माध्यमातून आजाराचे अचूक निदान होण्यास मदत होणार आहे. मोठी गुंतवणूक या लॅबसाठी झाली आहे. त्याचा परिपूर्ण उपयोग जिल्ह्यातील रुग्णांच्या आजारावरील निदानासाठी झाला पाहिजे.वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाची अडचण आहे,त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ.चौहान यांनी केले.

 
Top