धाराशिव (प्रतिनिधी)- आधुनिक जीवनशैलीच्या झगमगाटात आजची विवाह संस्था एका नव्या वळणावर उभी आहे. जोडीदाराकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा, त्यातून होणारा अपेक्षाभंग आणि त्यातूनच मानवी नात्यांना फाटा देऊन तांत्रिक पर्यायांकडे झुकणारी मानवी मानसिकता, याचे जळजळीत चित्रण चिरंजीव परफेक्ट बिघडलाय या नाटकाने धाराशिवकरांसमोर मांडले. माणूस हा कधीही परफेक्ट किंवा परिपूर्ण असूच शकत नाही, उलट त्याचा अट्टाहास धरणे हे मानवी भावनेचे किती केविलवाणे प्रदर्शन आहे, याचा प्रत्यय देत या नाटकाने मानवी स्वभावाचे अनेक पदर रसिक प्रेक्षकांसमोर उलगडले आणि त्यांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले.‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ या गाजलेल्या मराठी नाटकास धाराशिवमध्ये नाट्य रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा धाराशिव यांच्या वतीने मंगळवार, 5 मे रोजी रात्री 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते झाले. ‘जिगीशा’ निर्मित आणि चंद्रकांत कुलकर्णी प्रस्तुत या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन विनोद रत्ना यांनी केले आहे. वैभव रंधवे, समृद्धी कुलकर्णी आणि श्रेयस जोशी यांनी प्रभावी अभिनय साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. नेपथ्याची जबाबदारी ऋतुजा बोठे यांनी सांभाळली. तर प्रकाशयोजनेचे काम अभिप्राय कामठे यांनी पाहिले.

