धाराशिव  (प्रतिनिधी)- वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या 'नीट' 2026 परीक्षेतील गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. फेरपरीक्षा घेण्यात यावी, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या निषेधार्थ घोषणा .देण्यात आल्या. याबाबत सोमवारी (दि.18) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 

निवेदनात म्हटले की, देशातील लाखो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'नीट' परीक्षेची तयारी करतात. विद्यार्थी, पालक अनेक वर्षक कठोर मेहनत, आर्थिक व मानसिक ताण सहन करून या परीक्षेकडे आशेने पाहतात. मात्र 'नीट' परीक्षेत झालेल्या पेपरफुटी व गैरव्यवहारामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. परीक्षा व्यवस्थापनाचे हे अपयश केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) यांच्या निष्काळजी कारभाराचे द्योतक असून देशभरातून विद्यार्थी व पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.


त्यामुळे परीक्षेतील गैरव्यवहाराची सर्वोच्च स्तरावर निःपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी दोषींना तात्काळ अटक करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या कार्यपद्धतीची चौकशी करून आवश्यक सुधारणा कराव्यात, संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने सुरक्षित परीक्षा प्रणाली लागू करावी, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण देऊ नये अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पवार, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.मुशरफ सय्यद, प्रदेश सचिव श्रीराम हंगरगेकर, सौरभ गायकवाड, मोईज सय्यद, फुरखान इमाम, संकेत पडवळ, ॲड. इरफान जमादार, दादासाहेब गायकवाड आदींची स्वाक्षरी आहे.


 
Top