भूम (प्रतिनिधी)-  शहरातील विविध चौकांमध्ये अनधिकृतपणे उभारण्यात आलेले महामानवांचे पुतळे प्रशासनाने शनिवारी दि. 16 मे रोजी मध्यरात्री पोलिस बंदोबस्तात हटवले. या कारवाईमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सध्या शांतता राखण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

शहरातील गोलाई चौकात काही दिवसांपूर्वी दोन महापुरुषांचे पुतळे, जिजाऊ चौकात एक पुतळा, तर तहसील कार्यालय परिसरात एक पुतळा उभारण्यात आला होता. हे सर्व पुतळे बसविताना प्रशासनाची पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नव्हती. या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषद प्रशासनाला संबंधित अनधिकृत पुतळे हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी (ता. 16) मध्यरात्री नगर परिषद, महसूल विभाग व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने कारवाई करत पुतळे हटवले. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. 

भूम शहरातील अनधिकृतपणे बसवलेले पुतळे काढण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषदेला आदेश दिले होते. त्या अनुषंगाने नगर परिषदेने पुतळे काढले. त्यासाठी पोलिस प्रशासनाने बंदोबस्त दिला. शासनाच्या नियमाप्रमाणे पुतळे बसवावे. नागरिकांनी शांतता ठेवावी व कायद्याचे पालन करावे. असे आवाहन करण्यात आले आहे. 


 
Top