धाराशिव (प्रतिनिधी)- वारकरी शिक्षण संस्था चालकांच्या अध्यक्षपदी हभप सुधाकर महाराज इंगळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. धाराशिव, बार्शी, सोलापूर या भागातील वारकरी सांप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थाचालकांची बैठक शिंगोली सर्किट हाऊस येथे शनिवारी झाली. या बैठकीत ही निवड घोषीत करण्यात आली.

बैठकीत ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व वारकरी संस्थांना एकत्रित करून शासन दरबारी मदतीचा ओघ वाढवण्यासाठी मदत होईल असा विश्वास व्यक्त करत पंढरपूर येथील संस्थांना देखील सहभागी करून घेण्यावर एकमत झाले. तसेच वादंग, प्रवचन, किर्तनाची, नियमावली सर्वांनी पाळावी, वारकरी शिक्षण संस्थानी आचारसंहितेच्या चौकटीतून बाहेर पडू नये या मुद्यावरही चर्चा झाली. सर्वांना एकत्रित करणे कठीण आहे. आचारसंहितेचे नियम जास्त कठोर नसाव्या, पूर्वीचे नियम आता राहिले नाहीत. परिस्थितीनुसार बदलावे लागणार आहे. सर्व शिक्षण संस्थानी चालीरीतींना अधिक महत्व देण्याची गरज आहे, गांधर्वाचा आधार घैवून कीर्तन, प्रवचनाचा अभ्यास कार्यक्रम घ्यावा, त्यासाठी सहा वर्षाचा नियम करावा.प्रत्येक वारकरी शिक्षण संस्थानी 6 वर्षाची नियमावली तयार करावी. धाराशिव, बार्शी, पंढरपुर असे विभाग करून विभागनिहाय प्रमुखांची नेमणूक करून  त्यांना संलग्न करून घ्यावे, असेही बैठकीत ठरले.

बैठकीला हभप सुधाकर महाराज इंगळे, अंबॠषी महाराज पाटील, महादेव महाराज तांबे, प्रभाकर महाराज वाघचवरे, गणेश महाराज ढगे, समाधान महाराज शिंगण, योगेशबप्पा इंगळे, माऊली महाराज तांबे, दत्तात्रय महाराज राऊत, आकाश महाराज मगर, प्रतिक महाराज सूर्यवंशी, शुभम महाराज नवघरे, दादा महाराज सोनटक्के, सुखदेव महाराज काळे आदी शिक्षण संस्थांचे संस्थापक अध्यक्ष तसेच धाराशिव येथील ॲड.देशमुख यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी हभप सुधाकर महाराज इंगळे, अंबॠषी तात्या पाटील व महादेव महाराज तांबे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. बैठकीचे प्रास्ताविक हभप प्रभाकर वाघचवरे महाराज यांनी केले. 


वारकरी शिक्षण संस्थांनी एकत्र यावे

वारकरी शिक्षण संस्थांना नियमावली लावली पाहिजे, संस्थांमध्ये आता राजकारण्यांचा शिरकाव होतोय, कोणी सत्ताधाऱ्याच्या बाजुने नसेल तर कारवाईचा बडगा दाखवला जातो. हे कुठंतरी थांबावं म्हणून एकत्रित यावे अशी भावना यावेळी वारकरी बांधवांनी व्यक्त केली.


 
Top