धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धाडसी कारवाई करत तब्बल 62 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीस अटक करण्यात आली असून इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
यासंबधी सविस्तर वृत्त असे की, दिनांक 17 मे 2026 रोजी पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार पथक जिल्ह्यात पेट्रोलिंग व अवैध धंद्यांवर कारवाईसाठी रवाना झाले होते. दरम्यान, पथक येरमाळा परिसरात असताना वडजी शिवारातील डोंगराजवळील तलाव परिसरात एका लिंबाच्या झाडाखाली ताडपत्री झाकून मोठ्या प्रमाणात गुटख्याची पोती साठवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. तसेच त्या ठिकाणी तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पिढीतील काही इसम थांबले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सापळा रचला.
पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव यांना पथकासह घटनास्थळी बोलावून घेतले. पोलिसांनी छापा टाकताच तेथे बसलेले सात ते आठ इसम डोंगराच्या दिशेने पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता एक आरोपी ताब्यात घेण्यात यश आले. ताब्यात घेतलेल्या आरोपीने आपले नाव छगन बिसराम शिंदे (रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) असे सांगितले. पोलिसांनी ताडपत्री हटवून पोत्यांची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजनिवास गुटखा व सुगंधित तंबाखू आढळून आली. आरोपीने हा माल तेरखेडा येथील काही साथीदार व मस्सा येथील एका इसमासोबत आणल्याची कबुली दिली. या कारवाईत पोलिसांनी गुटखा, सुगंधित तंबाखू तसेच तीन मोटारसायकली असा एकूण 62 लाख 48 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, महिला पोलीस हवालदार शोभा बांगर, पोलीस कर्मचारी महेबूब अरब, रोहित दंडनाईक व प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
