तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तुळजापूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता 11 वी वर्गाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने दिनांक 17 मे 2026 ते 21 मे 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) या कालावधीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रवेशासाठी अर्ज शुल्क खुला, एसईबीसी व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 300 रु. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या-विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 200 रु. निश्चित करण्यात आले आहे. परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 21 मे 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत राहणार आहे. ऑफलाईन अर्ज विक्री व स्वीकृती ठिकाण श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर येथे आहे. तसेच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी https://sainikividyalayatuljapur.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाकडून पहिली गुणवत्ता यादी 23 मे 2026 रोजी जाहीर करण्यात येणार असून प्रथम गुणवत्ता यादीनुसार प्रवेश प्रक्रिया 26 मे 2026 ते 29 जून 2026 दरम्यान राबविण्यात येणार आहे. प्रवेशासाठी वयोमर्यादेच्या निकषानुसार विद्यार्थ्यांचा जन्म 1 जानेवारी 2009 ते 31 डिसेंबर 2011 दरम्यान असणे आवश्यक आहे.
विद्यालयात अनुभवी शिक्षकवृंद, एनडीए व एसएसबी तयारीसाठी निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, विज्ञान शाखेसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा तसेच कमी शुल्कात दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचा एसएससी फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. विद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी पर्यंत विज्ञान शाखेत शिक्षण घेणे बंधनकारक राहणार असून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी प्रवेशासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेस प्रविष्ट होणे आवश्यक राहणार आहे. अधिक माहितीसाठी 9403539044, 9960617002 किंवा 7588938494 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने व प्राचार्य वैजनाथ घोडके यांनी केले आहे.