भूम (प्रतिनिधी)-  शहरातील मध्यवर्ती गोलाई चौक परिसरात एका विशिष्ट समाजाचा झेंडा काढण्याच्या कारणावरून दोन परस्परविरोधी गटांमध्ये शुक्रवारी उशिरा रात्री तणाव निर्माण होऊन मोठा राडा झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस प्रशासनाने तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. या प्रकरणी दोन्ही गटांतील एकूण 61 जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घटनेनंतर शहरातील वातावरण संवेदनशील बनल्याने प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यामुळे चार किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली असून शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ आणि संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोलाई चौक परिसरात लावण्यात आलेल्या एका झेंड्याच्या मुद्यावरून दोन गट आमनेसामने आले. सुरुवातीला शाब्दिक वाद झाल्यानंतर वातावरण चिघळत गेले आणि दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. काही काळ धावाधाव, ढकलाढकली तसेच किरकोळ दगडफेकीचे प्रकार घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगविले. घटनेनंतर पोलीस विभागाने शहरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल व्हिडीओ आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे कारवाई करत 61 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. 

 
Top