धाराशिव (प्रतिनिधी)- खरीप 2025 हंगामातील पीक विम्यासंदर्भात मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला पेच अखेर सुटला आहे. कृषी विभाग आणि राज्य सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून धाराशिव जिल्ह्यातील 4 लाख 5 हजार 44 शेतकऱ्यांना सुमारे 336 कोटी 46 लाख रुपयांचा पीकविमा वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विमा कंपनीने घेतलेले तांत्रिक आक्षेप राज्यस्तरीय समितीने फेटाळून लावल्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम जमा होण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
धाराशिव जिल्ह्यासाठी खरीप 2025 अंतर्गत आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड ही विमा कंपनी कार्यरत आहे. जिल्ह्यातील 55 विमा युनिटमधील 368 पीक कापणी प्रयोगांवर कंपनीने आक्षेप नोंदवून अपील केले होते. कंपनीचा दावा होता की, पीक कापणी प्रयोगाची प्रक्रिया नियमानुसार झालेली नाही. मात्र, धाराशिव जिल्हाधिकारी स्तरावर हे आक्षेप आधीच फेटाळण्यात आले होते. तरीही कंपनीने राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे धाव घेतली होती. आपण स्वतः या प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालून कृषी विभागाचे प्रधान सचिव परिमल सिंग यांची भेट घेतली. सिंग इतर राज्यातील निवडणूक कर्तव्यावर असतानाही शेतकऱ्यांची निकड ओळखून त्यांनी ऑनलाईन सुनावणी घेतली. या सुनावणीत विमा कंपनीचे आक्षेप पुराव्याअभावी फेटाळून लावत जिल्हा समितीने 22 डिसेंबर रोजी घेतलेला निर्णय कायम ठेवला. परिणामी, कृषी आयुक्तालयाने आता पात्र शेतकऱ्यांचे दावे तात्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील 4 लाख 5 हजार 44 शेतकरी बांधवांना सुमारे 336 कोटी 46 लाख रुपयांचा पीकविमा वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना 524 कोटींची मदत
केवळ पीकविमाच नव्हे, तर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या 7 लाख 13 हजार 871 शेतकरी बांधवांना शासनाकडून 524 कोटी 78 लाख रुपयांची मदत यापूर्वीच वितरित करण्यात आली आहे. यामध्ये 5 लाख 75 हजार 744 हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचा समावेश आहे. त्यानुसार जून महिन्यातील नुकसानीपोटी 22 लाख रुपयांची मदत (1086 लाभार्थी), जुलै-ऑगस्ट 2025 मधील नुकसानीच्या मोबदल्यात 189 कोटी 61 लाख रुपये (2.33 लाख लाभार्थी), सप्टेंबर 2025 मधील नुकसानीचे 292 कोटी 49 लाख रुपये (4.04 लाख लाभार्थी) तर सप्टेंबर महिन्यातील अतिरिक्त नुकसानीचे 42 कोटी 46 लाख रुपये (63 हजार लाभार्थी) आपल्या महायुती सरकारने बळीराजाला दिलासा देण्यासाठी त्यांच्या खात्यात जमा केले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
