धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस ठाणे येरमाळा हद्दीत हायवेवरून जाणाऱ्या चालत्या ट्रकमधून चोरट्यांनी मेंढ्या चोरून नेल्याची घटना 23 मे 2026 रोजी पहाटे घडली होती. या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासांत छडा लावत दोन लाख 9 हजार रुपये किमतीच्या मेंढ्या जप्त केल्या असून टमटम वाहनासह एकूण 3 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी तपासाची सूत्रे हलवली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक,आरसीबी पथक क्रमांक 1 व क्यूआरटी पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. पोलीस पथक येरमाळा हद्दीतील हायवेवरील ब्रिज परिसरात तपास करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पिढी व उमरा पारधी पिढी येथील काही इसमांनी पहाटे चालत्या ट्रकमधून मेंढ्या चोरून आणल्या असून त्या उमरा पिढीजवळील बाभळीच्या झाडाखाली उभ्या असलेल्या लाल रंगाच्या टमटममध्ये ठेवण्यात आल्या आहेत.
माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस ठाणे येरमाळा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव, पोलीस कॉन्स्टेबल संतोष तिघाडे व संदीप चौगुले यांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचे पथक तेथे पोहोचताच एक संशयित इसम पळून गेला. त्याचा पाठलाग करण्यात आला मात्र तो अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.यानंतर पोलिसांनी टमटमची झडती घेतली असता त्यामध्ये चोरीस गेलेल्या मेंढ्या आढळून आल्या. फिर्यादीला घटनास्थळी बोलावून मेंढ्यांचे वर्णन विचारण्यात आले असता त्या ट्रकमधून चोरीस गेलेल्या मेंढ्याच असल्याची खात्री झाली.पोलिसांनी मेंढ्या व टमटम वाहन असा एकूण 3 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाणे येरमाळा येथे जमा केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, स.पो.नि. सचिन खटके, स. पो.नि. तात्याराव लहाने, पो.ह. विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, म.पो.ह. शोभा बांगर, पो.ना. संतोष तिघाडे, संदीप चौगुले, रोहित दंडनाईक तसेच आरसीबी पथक क्रमांक 1 व क्यूआरटी पथकाने पार पाडली.
