धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील वीरशैव जंगम मठ यांच्या वतीने 15 वर्षांखालील मुला-मुलींसाठी 10 दिवसांचा मोफत चित्रकला प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षण वर्गास 8 जून 2026 पासून सुरुवात होणार असून प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख 30 मे 2026 आहे.
धाराशिव सांजावेस गल्ली,येथील वीरशैव जंगम मठात या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार विविध कला प्रकार शिकवले जाणार आहेत. 10 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत बेसिक ड्रॉईंग, फिंगर पेंटिंग आणि थंब पेंटिंग शिकवले जाईल. तसेच 11 ते 15 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी 6 ते 7 या वेळेत वारली पेंटिंग आणि मंडला आर्ट पेंटिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक चित्रकला साहित्य स्वतः सोबत आणायचे असून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षण वर्गासाठी अनुभवी प्रशिक्षक म्हणून आर्ट झोन गॅलरी अँड क्लासेसच्या संस्थापक दिपाली पंडित मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमाचे संयोजन स्नेहल गिरीश पाळणे आणि सुलेशा शिवयोगी चपणे करत आहेत. मर्यादित प्रवेश असल्याने इच्छुक पालकांनी लवकर नोंदणी करून आपल्या पाल्यांचा सहभाग निश्चित करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी वीरशैव जंगम मठाचे श्री.गिरीश पाळणे, शिवयोगी चपने, वैजीनाथ गुळवे, श्रीकांत साखरे (महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष) यांच्याशी संपर्क साधावा.