भुम (प्रतिनिधी)-  मागील अकरा दिवसांपासून घनकचरा व्यवस्थापन पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे शहरातील चौका-चौकात कचऱ्याचे ढीग साचले होते. त्यामुळे संपूर्ण शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर भूम शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, 12 मेपासून शहरातील स्वच्छता व्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे.

भूम नगरपरिषदेकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी 31 मार्चपूर्वी नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र विविध कारणांमुळे निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याने विद्यमान ठेकेदारास पुढील दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. शहरात दोन्ही आघाडीची सत्ता असताना या निविदा प्रक्रियेला जनशक्ती शहर विकास आघाडीच्या वतीने विरोध करण्यात आला होता. त्यानंतर सर्वानुमते दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मात्र संबंधित ठेकेदाराचे तब्बल आठ महिन्यांचे देयक नगरपालिकेकडे प्रलंबित असल्यामुळे ठेकेदाराने 1 मेपासून घनकचरा व्यवस्थापनाचे काम बंद केले. परिणामी शहरातील घंटागाड्या बंद पडल्या आणि नियमित कचरा उचल न झाल्याने अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचले. मुख्य बाजारपेठ, चौक, सार्वजनिक ठिकाणे तसेच रहिवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली होती. दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले होते तसेच आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला होता. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा यांनी संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधून प्रलंबित देयके अदा करण्याबाबत लेखी पत्र दिले. प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्यानंतर ठेकेदाराने पुन्हा सेवा सुरू करण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर 12 मेपासून शहरातील घनकचरा व्यवस्थापन पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आले आहे.


 
Top