धाराशिव (प्रतिनिधी)- उस्मानाबाद, लातूर, बीड स्थानिक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून, निवडणुकीची अधिसूचना 25 मे रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. या मतदारसंघात तिन्ही जिल्ह्यातील मिळून प्राथमिक माहितीनुसार 1 हजार 50 मतदार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 20 मे रोजी झालेल्या या पत्रकार परिषदेस उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर उपस्थिती होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी पुजार यांनी इतर निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीसाठी आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 1 जून 2026 असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 4 जून 2026 आहे. तर मतदान दि. 18 जूनला होणार आहे. उस्मानाबाद, बीड, लातूर या तिन्ही जिल्ह्यात मिळून एकूण 29 मतदान केंद्र आहेत. या निवडणुकीत नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद यांचे सदस्य तर पंचायत समितीचे सभापती मतदानात भाग घेणार आहेत.
