तुळजापूर् (प्रतिनिधी)- “तुला आईची गरज आहे की वडिलांची?“ असा प्रश्न जेव्हा तडजोडी दरम्यान विचारण्यात आला, तेव्हा 8 वर्षांच्या चिमुकल्या मुलाने दिलेले मार्मिक उत्तर ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले.“मला आई आणि वडील दोघांचीही गरज आहे आणि माझ्यासाठी त्या दोघांनी एकत्र राहावे,“ अशी भावनिक साद मुलाने घातली आणि गेल्या 3 वर्षांपासून विभक्त राहणाऱ्या पती-पत्नीने आपले सर्व मतभेद विसरून पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला.
संबंधित पती-पत्नीचा विवाह 2015 मध्ये झाला होता. परंतु गेल्या 3 वर्षांपासून ते कौटुंबिक वादामुळे विभक्त राहत होते. हे प्रकरण धाराशिव येथील कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित होते. आज सुनावणी दरम्यान, ॲड. एम. बी. माढेकर, ॲड. धर्मराज सरडे आणि ॲड. विशाल बारकुल यांनी दोन्ही पक्षकारांमध्ये मध्यस्थी आणि समुपदेशनासाठी विशेष पुढाकार घेतला.
तडजोडीच्या चर्चेदरम्यान ॲड. एम. बी. माढेकर यांनी मुलाला विश्वासात घेऊन त्याची इच्छा विचारली. तेव्हा त्याने दिलेल्या संवेदनशील उत्तराने कायदेशीर वादापेक्षा मुलाचे प्रेम आणि भविष्य किती श्रेष्ठ आहे, याची जाणीव पालकांना झाली. मुलाच्या या उत्तराने पालकांच्या मनातील कटुता संपली आणि त्यांनी कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशन कक्षात पुन्हा आनंदाने संसार करण्याचा निर्णय घेतला.
तडजोड आणि समेट
महाराष्ट्र फॅमिली कोर्ट रूल्स 1987 च्या कलम 31 अन्वये तयार करण्यात आलेल्या तडजोड पत्रावर आज दोन्ही पक्षकारांनी स्वाक्षऱ्या केल्या. आजपासूनच हे दाम्पत्य सर्व जुने वाद विसरून एकत्रित राहून आपल्या मुलाचा सांभाळ करणार आहे. एका चिमुकल्याच्या इच्छेखातर आणि ॲड. एम. बी. माढेकर, ॲड. धर्मराज सरडे आणि ॲड. विशाल बारकुल यांनी केलेल्या सामाजिक बांधिलकीच्या प्रयत्नांना यश आले एका विखुरलेल्या कुटुंबाला पुन्हा एकत्र आणले.
