तुळजापूर्‌‍ (प्रतिनिधी)- अक्षय तृतीया सणापासून तीर्थक्षेत्र तुळजापूरमध्ये गढूळ व अनियमित पाणीपुरवठा सुरू असल्याने नागरिकांसह भाविकांचे मोठे हाल होत आहेत. स्वच्छ पाणीपुरवठा कधी होणार, असा सवाल शहरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे. सणासुदीच्या काळातच गढूळ पाणी मिळत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे विशेषतः मंगळवार, शुक्रवार व रविवार या दिवशी लाखो भाविक श्री तुळजाभवानी दर्शनासाठी येत आहेत. मात्र, मंगळवारी शहराला एक दिवस उशिरा पाणीपुरवठा झाला आणि तोही गढूळ असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. यामुळे भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध नसल्याने बाटलीबंद पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. शेकडो कोटी रुपयांच्या विकासकामांचा गाजावाजा होत असतानाही मूलभूत गरज असलेले स्वच्छ पाणी मिळत नसल्याने श्रीक्षेत्र तुळजापूर विकास आराखड्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठ्यासाठी योग्य नियोजनाची गरज निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनाही गढूळ पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत असून, अनेकजण पाणी विकत घेऊन वापरत आहेत. गढूळ पाण्यामुळे पोटाचे आजार व संसर्गजन्य रोग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

यापूर्वीही अशा प्रकारे गढूळ पाणीपुरवठा झाल्यानंतर नगरपरिषदेकडून उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, पुन्हा त्याच समस्या उद्भवल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. जलशुद्धीकरण केंद्रातील टाक्या स्वच्छ करूनही गढूळ पाणी येत असल्याने तुरटी व इतर शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या दर्जाबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी दर्जेदार रसायनांचा वापर करून पाणी शुद्ध करण्याची मागणी केली आहे.

 

पुढील 40 दिवस ठरणार आव्हानात्मक

उन्हाळी सुट्ट्या अद्याप सुरू असून, पुढील काही दिवसांत भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत गढूळ पाणीपुरवठा कायम राहिल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

 
Top