धाराशिव (प्रतिनिधी)- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती व रमाई फाउंडेशन धाराशिव तसेच शिवसेना डॉक्टर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत सर्व रोग निदान उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन दि.12 एप्रिल रोजी करण्यात आले असल्याची माहिती जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चिलवंत यांनी दिली आहे. 

महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरामध्ये लहान मुलांच्या हृदयाची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गरीब व गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या मार्फत मोफत करण्यात येईल. तसेच ॲंजिओग्राफी 50 टक्के दरात तर सोनाग्राफी व पायातील नसांची तपासणी 50 टक्के दरात करण्यात येणार आहे. त्याबरोबरच अपंगासाठी अत्यावश्यक असणारे साहित्य मिळवून देण्यात येईल. तसेच सर्व प्रकारची औषधे मोफत देण्यात येणार आहेत. या शिबिरात येणाऱ्या रुग्णांची तपासणी शिवसेना डॉक्टर सेलचे प्रदेश प्रमुख डॉ धनंजय पडवळ, जनरल फिजिशियन डॉ. पंकज शिनगारे, बालरोग तज्ञ डॉ स्वप्निल भोसले, डॉ अजित डिकले, डॉ स्वप्निल शिंदे, नेत्ररोग तज्ञ डॉ महेश पाटील, जनरल फिजिशियन डॉ शकील खान, दंत रोग तज्ञ डॉ अविनाश तांबारे, नाक कान घसा तज्ञ डॉ व्यंकटेश पोलावार, त्वचा रोग तज्ञ डॉ धवलकुमार बनसोडे, स्त्री रोग तज्ञ डॉ अश्विनी पडवळ - मुंडे, अस्थिरोग तज्ञ डॉ कृष्णा स्वामी, कन्सल्टंट फिजिशियन डॉ सागर सुर्यवंशी व डॉ प्रियंका मुंडे-डिकले या तज्ञ डॉक्टरांची टीम आरोग्याची तपासणी करणार आहे. हे शिबिर धाराशिव शहरातील बौद्ध नगर येथील संविधान चौकातील जम्बुद्वीप विहारात करण्यात आले आहे. त्यामुळे या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समिती अध्यक्ष पृथ्वीराज चिलवंत यांनी केले आहे.


 
Top