धाराशिव (प्रतिनिधी)- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव यांनी आर्थिक वर्ष सन 2025-26 मध्ये शासनाने दिलेल्या महसूल उद्दिष्टानुसार 114.57 टक्क्यांपेक्षा जास्त महसूल वसुली करत उल्लेखनीय कामगिरी बजावली असून, या यशामुळे कार्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आर्थिक वर्ष 2025 -26 मध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव यांनी तब्बल 126 कोटी 30 लाख रुपयांचा महसूल शासनास मिळवून दिला आहे.मागील वर्षीच्या 97 कोटी 62 लाख महसूल वसुलीच्या तुलनेत यंदा लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विशेष मेहनतीमुळे हे उद्दिष्ट साध्य झाले असून,शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे 114.57 टक्के महसूल वसुली करण्यात यश आले आहे.
महसूल प्राप्तीमध्ये वाहन नोंदणीचा मोठा वाटा असून वर्षभरात एकूण 38 हजार 624 वाहनांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये 26 हजार 708 दुचाकी,3 हजार 627 चारचाकी,515 ऑटोरिक्षा,1 हजार 548 मालवाहू वाहने, 279 प्रवासी वाहने तसेच इतर वाहनांचा समावेश आहे.तसेच आकर्षक पसंती क्रमांक शुल्काद्वारे 2 हजार 553 वाहनधारकांकडून 3 कोटी 19 लाख रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे. कार्यालयातील वायुवेग पथकानेही प्रभावी कामगिरी करत 19 हजार 475 दोषी वाहनांवर कारवाई केली असून 4 कोटी 5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान 2026 अंतर्गत दिनांक 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत शहर व जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. पादचाऱ्यांमध्ये अपघाताचे प्रमाण जास्त असल्याने उजवीकडून चला या संकल्पनेचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच झेब्रा क्रॉसिंग, आणि दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापरण्याचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्यात आली.