धाराशिव (प्रतिनिधी)-  क्रिमिलेअरची अट नोकरीच्या आरक्षणाला असेल तर ती राजकीय आरक्षणाला देखील लावावी. दोन वेळा खासदार किंवा आमदार झाल्यानंतर त्याला पुन्हा निवडणुकीस बंदी घालावी. तसेच पक्षांतर केल्यास त्याचे सदस्यत्व रद्द करीत पक्षांतर बंदीचा कायदाच रद्द करण्यात यावा, अशी आग्रही मागणी ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांनी केली. धाराशिव शहरातील गोरे कॉम्प्लेक्स येथील नालंदा फॅशन डिझायनिंग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या फुले-आंबेडकरी चळवळीची कोंडी आणि ती फोडण्याचा मार्ग या विषयावर ते बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ बाबासाहेब आंबेडकर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्रा रवी सुरवसे, सचिव नागनाथ गोरसे, मारोती पवार, प्रा.अंबादास कळासरे, अमोल गडबडे, प्राचार्य डॉ रमेश दापके आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

पुढे बोलताना जेष्ठ पत्रकार कांबळे म्हणाले की, जातीयवादी व्यवस्थेने सत्ता व ज्ञान यापासून वंचित ठेवल्यामुळे फुले आंबेडकरांनी बंड केल्याचे सांगत ते म्हणाले की, 2020 पासून शस्त्र व शास्त्र मिळवून देण्याची लढाई सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जातगणनेच्या माध्यमातून संपत्तीचे समान वाटप करणार आहेत का ? असा सवाल त्यांनी विचारला.  यावेळी अरविंद गोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा रवी सुरवसे यांनी केले. तर सूत्रसंचालन बाबासाहेब मनोहर यांनी केले. तर आभार मनिषा ताकपीरे यांनी मानले. 


 
Top