धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती धाराशिव, अक्षरवेल आणि ब्रम्हा कुमारी परिवार यांच्यातर्फे वडगाव (सि.) येथे कवयित्री बी सुरभी यांच्या मोरपीस व अवघा रंग या दोन काव्यसंग्रहांचा प्रकाशन सोहळा अगदी उत्साहात संपन्न झाला. 

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती देवगिरी प्रांत मंत्री युवराज नळे होते तर जेष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे उपसभापती प्रमोद पाटील तर जेष्ठ साहित्यिक कमलताई नलावडे, अक्षरवेल अध्यक्षा सुलभाताई देशमुख, जिल्हा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष देविदास पाठक, साहित्य भारतीचे कार्यवाह रवींद्र शिंदे, भैरवनाथ कानडे, सुनिता गुंजाळ कवडे, कृष्णा साळुंके, बी के कृष्णा दिदी, बी के प्रीती दिदी, बी के मीरा दिदी, संतोष वाडकर, कमलाकर कुलकर्णी, यांची प्रमुख उपस्थिती होती.

 महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आयुष्यावर निघालेल्या चित्रपटात गीतकार म्हणून योगदान देणाऱ्या बी सुरभी यांनी लिहिलेल्या कवितांना असलेला अध्यात्मिक स्पर्श, कवयित्रीची वैचारिक उंची दर्शवते असे प्रतिपादन उद्घाटक युवराज नळे यांनी व्यक्त केले. अध्यक्षिय समारोप करताना जेष्ठ कवी राजेंद्र अत्रे यांनी बी सुरभी यांच्या काव्य लेखनाचा यथार्थ आढावा घेतला. उपसभापती प्रमोद पाटील, सुलभाताई देशमुख यांनीही यथोचित शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा भैरवनाथ कानडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ रुपेशकुमार जावळे यांनी केले. याप्रसंगी साहित्यिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 
Top