धाराशिव (प्रतिनिधी)-  राज्य शासनाच्या “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत आज जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.या ग्रामसभांमध्ये गावाच्या सर्वांगीण आरोग्यवृद्धीसाठी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुधारणे,प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविणे आणि स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती करणे हा आहे.ग्रामसभांमध्ये गावातील आरोग्य स्थितीचा आढावा घेत कुपोषण,माता व बाल आरोग्य, संसर्गजन्य आजारांचे नियंत्रण, स्वच्छ पाणीपुरवठा,कचरा व सांडपाणी व्यवस्थापन तसेच स्वच्छता या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. उपचारांपेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करणे, माता-बाल आरोग्य सुधारणा,पोषण, सुरक्षित पाणी,स्वच्छता, जीवनशैलीजन्य आजारांचे नियंत्रण तसेच मानसिक आरोग्य यांचा समावेश आहे.नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा विशेष भर आहे.

ग्रामसभांमध्ये आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक गावासाठी आरोग्य कृती आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला असून,प्रत्येक कुटुंबाचा आरोग्य तपशील नोंदवून नियमित तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. “स्वच्छ गाव,निरोगी गाव” या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. नियमित व्यायाम,संतुलित आहार, लसीकरण आणि वैयक्तिक स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात आली.तसेच तंबाखू व मद्यपानाच्या व्यसनमुक्तीसाठी विशेष मोहिमा राबविण्याचे आवाहन करण्यात आले.

 
Top