धाराशिव (प्रतिनिधी)- बैठकीत विविध योजनांची प्रगती, अंमलबजावणी आणि येणाऱ्या अडचणींचा सखोल आढावा घेण्यात आला. विशेषतः जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची स्थिती, संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना, तसेच विंधन विहिरी अधिग्रहण यावर गांभीर्याने चर्चा करण्यात आली.
यासोबतच ग्रामपंचायत स्तरावरील सर्व शासकीय इमारतींचा आढावा घेण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा तसेच इतर इमारतींचे निर्लेखन, दुरुस्ती व नव्या बांधकामासंदर्भात आवश्यक सूचना देण्यात आल्या.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसीची सद्यस्थिती, त्यामध्ये आशा कार्यकर्त्यांचा सहभाग वाढविणे, तसेच आयुष्यमान कार्ड वितरणाची प्रगती यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्या तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. धाराशिव प्रियंवंदा महाडदळकर, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील, उपाध्यक्षा उषाताई गायकवाड, प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे, समाज कल्याण सभापती विश्वास कोकणे, पंचायत समिती सभापती गोकर्णाताई कदम, उपसभापती प्रमोद पाटील, तसेच तालुक्यातील सन्माननीय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) अनंत कुंभार, कार्यकारी अभियंता (ग्रापापु) कटकधोंड, शिक्षणाधिकारी (प्रा) खंदारे, गट विकास अधिकारी पं.स. धाराशिव संतोष नलावडे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व विभागांनी समन्वय साधून विकासकामांना गती देत नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
