भूम (प्रतिनिधी)- जनशक्ती शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या दुटप्पी भूमिकेमुळे शहरातील नागरिकांचे पाण्या वाचून हाल होणार आहेत. उन्हाळ्यात त्यांची मोठी गैरसोय होणार आहे. एकंदरीत एक एप्रिल पासून पाणीपुरवठा, विद्युत विभाग, उद्यान विभाग यावर कार्यरत असणारे रोजंदारी कर्मचारी कमी केल्याने शहरवासियांना जो त्रास होत आहे त्याबद्दल नगराध्यक्ष म्हणून मी शहरवासीयांची दिलगिरी व्यक्त करते असे म्हणून, यावेळी नगराध्यक्ष संयोगीता गाढवे यांनी शहरवासीयांची माफी मागून शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांनी एकत्र बसून शहराचा विकास करावा असे आवाहन नगराध्यक्ष संयोगिता गाढवे यांनी पत्रकार परिषदेत केले.
भूम नगरपालिकेच्या सभागृहात गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, गटनेते सुरज गाढवे, नगरसेवक अभिजीत शेटे उपस्थित होते. भूम नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर नगराध्यक्ष व नगरसेवकांनी पदभार स्वीकारल्यानंतरही नगरपालिकेचा कारभार अद्याप पर्यंत ही सुरळीत चालू झालेला नाही. नगरपालिकेमध्ये जे कर्मचारी रोजंदारी वर काम करत होते. त्यामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. मात्र त्या ठिकाणचे कर्मचारी यांचे काम जनशक्ती शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या आडमुट्या भूमिकेमुळे थांबवले आहे. शहरामध्ये पाणीपुरवठा सुरळीत राहणे उन्हाळ्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.
आम्ही जी कामे शासनाकडून मंजूर करून आणलेली आहेत ती कामे शहरांमध्ये करू द्यायची नाही. आणि नवीन कामे मंजूर करा असा तगादा सभागृहामध्ये लावायचा अशी भूमिका या नगरसेवकांची असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भूम शहरातील सर्वच कामांची चौकशी शासनाने केली आहे. त्यामध्ये चुकीचे असे काहीही आढळलेले नाही. भूम शहराला अमृत 2 ही पाणीपुरवठा योजना मंजूर झालेले आहे. बहुतांश काम देखील या योजनेचे पूर्ण झालेले आहे. मात्र जनशक्तीचे नगरसेवक दुसऱ्या पाईपलाईनची मागणी सभागृहामध्ये करत आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण अशी योजना शासनाने दिल्यानंतर शासन दुसरी योजना देऊच शकत नाही.
