धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलु होते. ज्ञानसाधना ही सर्व पैलूंचे आधारस्तंभ असते. असे प्रतिपादन मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय लातूरचे प्रा. डा. अशोक नारनवरे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात फुले आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. अशोक नारनवरे यांचे “विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ज्ञानसाधना“ या विषयावर विशेष व्याख्यान संपन्न झाले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. रमेश चौगुले यांनी अध्यक्षस्थान भुषविले.
पुढे बोलताना प्रा. डॉ. अशोक नारनवरे म्हणाले की, मुंबई येथील मलबार हिलवरील राजवाड्यात सयाजीराव गायकवाड यांनी डॉ. आंबेडकर यांची मुलाखत घेऊन अमेरिकेत शिक्षणाकरिता शिष्यवृत्तीसाठी निवड केली. शिक्षणातून समाजाची अवगत अवस्था सुधारणार आहे, असे उत्तर डॉ. आंबेडकर यांनी दिले. गुणवत्ता बघुन महाराजांनी अमेरिकेला शिकण्यासाठी शिष्यवृत्ती दिली. बुद्ध आणि त्यांचा धर्म हा त्यांचा अखेरचा ग्रंथ आहे.
नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पथनाट्य सादर केले. यावेळी रक्तदान शिबिरात 21 जणांनी सहभाग घेतला, त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. महेश्वर कळलावे यांनी 52 व्या वेळेस रक्तदान केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यालयातील कर्मचारी अशोक लोंढे, हेमंत साने,व विद्यार्थी वैभव भोरे यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. 18 तास वाचन उपक्रमात सहभाग घेतल्याबद्दल विद्यार्थांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.
विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. रमेश चौगुले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी विकास विभाग समन्वयक डॉ. गणेश शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. राहुल खोब्रागडे यांनी आभार व्यक्त केले. विद्यापीठ उपपरिसरातील विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
