मुरुम (प्रतिनिधी)- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरा यानी आपल्या आयुष्यभर शिक्षण, समानता आणि बंधुता या तत्त्वांचा प्रचार केला. या तत्त्वाचा प्रचार झाला पण आपण त्याचा स्विकार आणि पालन करतो काय? त्यांनी स्पष्टपणे सांगितले “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.” आजच्या युगातही हे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण शिकलो, संघटित झालो, पण कशासाठी? संघर्ष करतो आहे कशासाठी? या सर्व बाबीवर चिंतन आणि मनन करण्याची आज गरज आहे.
14 एप्रिल हा दिवस केवळ जयंती साजरी करण्याचा नसून, त्यांच्या या विचारांचा अंगीकार करण्याचा आहे. आजचे शिक्षक/प्राध्यापक हे समाजाचे शिल्पकार असतात. केवळ पुस्तकातील ज्ञान देणे हे त्यांचे कार्य नाही, ते ऑनलाईन मिळतेच. पण विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती, नैतिकता, मूल्ये-संस्कार, याबरोबरच त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता युगातही डॉ. बाबासाहेब यांचे हे विचार शिक्षकांनी, विद्यार्थ्यांमार्फत समाजात रुजवले तर नक्कीच आपण एक समतावादी आणि प्रगत भारत घडवू शकतो. असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले यानी. केले.
येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात महान विचारवंत, भारतीय संविधानाचे शिल्पकार, आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. अस्वले त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि सर्व स्टाफच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यानी आपले मत व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, पर्यवेक्षक प्रा. एस ए. महामुनी, प्रबंधक राजकुमार सोनवणे, डॉ. ए एस पदमपल्ले, प्रा. मुरली जाधव सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
