धाराशिव (प्रतिनिधी)- कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मासिक रोजगार व स्वयंरोजगार धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने सुशिक्षित बेरोजगार व नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्लेसमेंट ड्राइव्ह तथा पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून बुधवार,२९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता भाई उध्दवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,धाराशिव येथे जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव आणि भाई उध्दवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळावा / प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आला आहे.
या रोजगार मेळाव्यात टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा.लि.यांच्या "शिका व कमवा" (Learn & Earn) योजनेअंतर्गत तरुणांसाठी कौशल्य विकासाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेनिंग यांच्या सहकार्याने उमेदवारांना जागतिक दर्जाचे निवासी तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये ऑटोमोटिव्ह वेल्ड टेक्निशियन,ऑटोमोटिव्ह पेंट टेक्निशियन,ऑटोमोटिव्ह असेंब्ली टेक्निशियन आणि मेकॅट्रॉनिक्स टेक्निशियन यांसारखे विविध तांत्रिक कोर्सेस उपलब्ध आहेत.या प्रशिक्षणाचा कालावधी दोन वर्षांचा असून प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी सुमारे १५ हजार ८१५ रुपये,तर दुसऱ्या वर्षी १७ हजार ६४५ रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.
यासोबतच विद्यार्थ्यांना निवासी सुविधा, राहण्याची सोय,संगणक कक्ष,क्रीडा सुविधा आदी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गुणवत्तेच्या आधारे संबंधित कंपनीमध्ये नियमित नोकरीची संधी देखील मिळणार आहे.
या रोजगार मेळाव्यासाठी १८ ते २० वर्षे वयोगटातील १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र असतील. उमेदवारांना मराठी,हिंदी किंवा इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी बुधवार,२९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता भाई उध्दवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव येथे प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे. जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी या रोजगार मेळावा / प्लेसमेंट ड्राइव्हचा लाभ घ्यावा,असे आवाहन सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव यांनी केले आहे.