धाराशिव (प्रतिनिधी)-  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय, धाराशिव येथे ‌‘अभ्यास अभिवादन‌’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. जीएनएम व एएनएम परिचारिका विद्यार्थ्यांनी तब्बल 12 तास सलग अभ्यास करून महामानवांना अभिवादन केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आयोजित परिचारिका प्रशिक्षण सभागृहात पार पडलेल्या या उपक्रमात सकाळी 7 ते सायंकाळी 7 या कालावधीत 100 हून अधिक विद्यार्थी शांततेत अभ्यासात तल्लीन झाले होते. नीरव वातावरणात ज्ञानार्जन करत विद्यार्थ्यांनी आंबेडकरांच्या ‌‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा‌’ या संदेशाला कृतीत उतरवले. उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा सखोल अभ्यास करून समाजसेवेत योगदान द्यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमास अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. तानाजी लाकाळ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. फुलारी, डॉ. भास्कर साबळे, मेट्रन सुमित्रा गोरे, प्राचार्य रवी सुरवसे यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना चहा व नाश्त्याची सोय करण्यात आली होती. तसेच सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या अभिनव उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

 
Top