धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव नगरपरिषद कार्यालयात कार्यरत असणारे व उमरगा तालुक्यातील केसर जवळगा येथील सुपुत्र आशिष विक्रमसिंह ठाकूर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आहे. ठाकूर यांना आदिवासी विकास विभागातील ‌‘सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण)‌’ पदावर निवड झाली आहे. 

धाराशिव नगर परिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय येथे कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या ठाकूर यांनी नोकरी सांभाळत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. एमपीएससीच्या प्रवासात त्यांनी सात वेळा मुख्य परीक्षा दिली. तसेच तिसऱ्यांदा मुलाखत दिल्यानंतर अखेर त्यांना यश मिळाले. 

आशिष ठाकूर यांचे प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण सोलापूर येथे झाले असून त्यांनी बी.ई. (मेकॅनिकल) ही अभियांत्रिकी पदवी मिळवली आहे. त्यांचे वडील कै. विक्रमसिंह ठाकूर हे शिक्षक होते. तर आई कै. उमादेवी ठाकूर या गृहिणी होत्या.आशिष याने आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही त्यांनी परिस्थितीशी लढा देत आपले ध्येय गाठले.या यशामुळे केसर जवळगा गावात आनंद व्यक्त होत आहे.त्याच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 
Top