धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय स्वातंत्र्यलढयाला सामाजिक आशय देण्याचे ऐतिहासिक कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असे प्रतिपादन प्रा. राजा जगताप यांनी केले. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
प्रा. जगताप म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मते राष्ट्राचा खरा नायक म्हणजे माणूस व राष्ट्र म्हणजे माणसा माणसातील संबंध,हे संबंध समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय यावर आधारित असावेत. भारतीय स्त्री आणि दलित हे पूर्वीपासून उपेक्षित असलेले घटक होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नातून सर्व जातीतील स्त्रियांना एकाच पातळीवर येण्याची संधी संविधानाच्या माध्यमातून मिळाली असे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषण प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांनी केले. या प्रसंगी प्रा सचिन चव्हाण, प्रा बबन सुर्यवंशी ,प्रा माधव उगिले, डॉ केशव क्षीरसागर, सुमेर कांबळे यांच्या सह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विवेकानंद चव्हाण यांनी केले. तर आभार प्रा डॉ बालाजी गुंड यांनी मानले.
