धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, धाराशिव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सामाजिक समता, शिक्षणाचे महत्त्व आणि भारतीय संविधानातील मूल्यांची जाणीव करून देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. विक्रम सिंह माने यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा गौरव केला. यामध्ये प्राचार्य डॉ. विक्रम सिंह माने यांनी आपल्या मनोगतात डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा सर्वांगीण विकास साधण्याचे तसेच समानता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. “शिक्षण हेच खरे शस्त्र आहे” हा डॉ. आंबेडकरांचा संदेश आजच्या काळात अधिकच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एनएसएस समन्वयक प्रा. डी. डी. मुंडे यांनी विशेष परिश्रम घेतले असून कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.या प्रसंगी डीन अकॅडमी व मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. डी. डी. दाते, बीएसएच विभाग प्रमुख डॉ. उषा वडणे, सिव्हिल विभाग प्रमुख प्रा. शीतल पवार, हॉस्टेल समन्वयक प्रा. आर. डी. गुरव, एनएसएस समन्वयक प्रा. डी. डी. मुंडे, डीन स्टुडंट्स वेल्फेअर डॉ. राजश्री यादव, प्रा. संदीप नलगे, प्रा. वर्षा पाटील, प्रा. ऐश्वर्या सक्राते,  रामेश्वर मुंडे,  एस. एन. नेपते व पी. पी. वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित भाषणे, घोषवाक्ये आणि चर्चांद्वारे आपले विचार प्रभावीपणे मांडले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा, त्यांच्या संघर्षाचा आणि समाजासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाचा सखोल परिचय झाला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली. संपूर्ण कार्यक्रम उत्साह, शिस्त आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

 
Top